श्री संत संताजीचे अभंग: माझिया जातीचा मज भेटो कोणी । आवडिची धनी पुरवावया ।। १ ।। माझिया जातीचा मजशी मिळेल । कळेल तो सर्व समाचार ।। २ ।। संतु म्हणे येथे पाहिजे जातीचे । येर गबाळाचे काम नाही ।। ३ ।। श्री संत संताजीचे अभंग क्र. २ एकादशी दिनी संतु तुका वाणी । राऊळा आंगणी उभे होते ।। १ ।। तेव्हा संतु तेली गेलासे दर्शना । पांडुरंग चरणा नमियेले ।।२।। तेथुनी तो आला तुका जेथे होता । अलिँगन देता झाला त्याशी ।।३।। तुका म्हणे संतु पुसतो तुजला । सांगतो तुजला संतु म्हणे ।।४।। श्री संत संताजीचे अभंग क्र. ३ तुजशी ते ब्रम्हज्ञान कांही आहे । किंवा भक्तिमाय वसे पोटी ।। १ ।। काय तुझ्या मागेँ कोण तुज सांगे । काय ते अभंग जाणितले ।।२।। घाणाची घेऊनी बैसलासि बुधा । जन्म पाठिमागा का गेला ।।३।। तुका म्हणे सर्व सांग तु मजला । सांगतो तुजला संतु म्हणे ।। ४।।

शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वचन संत तुकारामांनी संताजीना दिले होते. परंतु तुकाराम हे श्री संताजी जगनाड्यांच्या अगोदरच वैकुंठाला गेले. असे म्हणतात की, जेव्हा संताजी देहावसान तेव्हा अंत्य संस्काराच्यावेळी कितीही प्रयत्न केले तरी काही श्री संताजींचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते, त्याचा चेहरा वरच राहत होता. तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले व त्यांनी तीन मुठी माती टाकल्यानंतर श्री संताजींचा पूर्ण देह झाकला गेला.

I