श्री संत संताजीचे अभंग: माझिया जातीचा मज भेटो कोणी । आवडिची धनी पुरवावया ।। १ ।। माझिया जातीचा मजशी मिळेल । कळेल तो सर्व समाचार ।। २ ।। संतु म्हणे येथे पाहिजे जातीचे । येर गबाळाचे काम नाही ।। ३ ।। श्री संत संताजीचे अभंग क्र. २ एकादशी दिनी संतु तुका वाणी । राऊळा आंगणी उभे होते ।। १ ।। तेव्हा संतु तेली गेलासे दर्शना । पांडुरंग चरणा नमियेले ।।२।। तेथुनी तो आला तुका जेथे होता । अलिँगन देता झाला त्याशी ।।३।। तुका म्हणे संतु पुसतो तुजला । सांगतो तुजला संतु म्हणे ।।४।। श्री संत संताजीचे अभंग क्र. ३ तुजशी ते ब्रम्हज्ञान कांही आहे । किंवा भक्तिमाय वसे पोटी ।। १ ।। काय तुझ्या मागेँ कोण तुज सांगे । काय ते अभंग जाणितले ।।२।। घाणाची घेऊनी बैसलासि बुधा । जन्म पाठिमागा का गेला ।।३।। तुका म्हणे सर्व सांग तु मजला । सांगतो तुजला संतु म्हणे ।। ४।।
श्री संत जगनाडे महाराज

(अंदाजे इ.स. १६२४ – इ.स. १६८८) हे संत तुकारामांनी रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे – अर्थात तुकाराम गाथेचे – लेखनिक होते. महाराष्ट्रातील सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते .

बालपण

श्री संत संताजी महाराजांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ ला झाला असं मानलं जातं. ९ फेब्रवारी २००९ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या काळात त्यांच्यावरील एक पोस्ट तिकीट निघालं. यात त्यांचा कार्यकाळ १६२४ ते १६८८ असा सांगितला आहे. शासकीय माहितीनुसार श्री संताजी महाराज हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन ठरतात. काही मतप्रवाहानुसार त्यांचा कार्यकाळ १६०८ ते १६५० असाही सांगितला जातो. मात्र वारकरी श्री संताजी महाराजांना संत तुकाराम महाराजांच्या १४ टाळकऱ्यांपैकी एक मानतात. डॉ. किशोर सानप यांच्या ‘समग्र तुकाराम दर्शन’ या ग्रंथात संत चरित्रकार महिपतीबोवांनी संत तुकोबारायांच्या १४ टाळकऱ्यांचा उल्लेख केल्याचे नमूद आहे. सकल संतगाथेच्या दुसऱ्या खंडात एक वेगळा उल्लेख आहे. त्यात म्हटलं आहे की, वा. सी. बेंद्रे यांनी श्री संताजी महाराजांचा काळ १६५० च्या पुढील मानला आहे.

श्री संताजी महाराजांचे आजोबा भिवाशेठ जगनाडे यांचा तेलाचा घाणा होता. तेलाचा हा व्यवसाय त्यांचा मुलगा विठोबाशेठ यांच्याकडे आला. विठोबाशेठ यांचं लग्न सुदुंबरे येथील काळे परिवारातील मथुबाईंसोबत झालं. काही ठिकाणी त्यांच्या नावाचा मथाबाई असाही उल्लेख येतो. विठोबा आणि मथाबाईंच्या पोटी संताजी महाराजांचा जन्म झाला. श्री संताजींना अक्षरओळख, गणित असं बऱ्यापैकी शिक्षण मिळालं . श्री संताजी अत्यंत तल्लख बुद्धिमत्तेचे होते. त्यांची निरीक्षणं अत्यंत सूक्ष्म असायची. वयाच्या दहाव्या वर्षी वडलोपार्जित तेलाच्या व्यवसायात श्री संताजींचा प्रवेश झाला. अकराव्या वर्षी श्री संताजींच्या विवाहासाठी स्थळ सांगून आलं. त्याकाळात लग्न बालवयातच व्हायची. खेड येथील कहाणे परिवारातील यमुनाबाईंसोबत त्यांचं लग्न झालं. पुढे चालून त्यांना बाळोजी व भागू ही मुलं झालीत.

श्री संताजी महाराजांच्या बालपणीची एक आख्यायिका सांगितली जाते. ते रोज आपल्या आईसोबत गावातील चक्रेश्वर मंदिरात जात. गावातील या मंदिरात आई पूजा करायची आणि देवाला नैवेद्य अर्पण करायची. चक्रेश्वराच्या मंदिरात अनेकजण आश्रयाला राहत. एके दिवशी एक भुकेने व्याकूळ झालेला मनुष्य त्यांना दिसला. श्री संताजींनी नैवेद्याचं ताट त्या भुकेल्या माणसाला दिलं. तो तृप्त झाला. मात्र नैवेद्यासाठी आणलेलं ताट श्री संताजींनी कुणालातरी दिल्याने आई रागावली. त्यावर श्री संताजी महाराज म्हणाले मी, ज्याला अन्नाची जास्त गरज आहे त्याला पहिल्यांदा ते दिलं पाहिजे. लहानपणीच त्यांना माणसातील ईश्वर दिसला.

श्री संताजी महाराज आपला प्रपंच, व्यवसाय आणि समाज यात उत्तम संतुलन साधत. संत तुकाराम महाराजांनी अध्यात्म आणि विज्ञान लोकांना समजावून सांगितलं. त्यामुळे वैदिक कर्मकांड करणाऱ्यांचा विरोध व छळ त्यांना भोगावा लागला. श्री संताजी महाराज हे त्यांच्या पक्षातले, म्हणून हा दाह त्यांच्याही वाट्याला आलाच. पण श्री संताजी महाराज डगमगले नाहीत. त्यांनी आपल्या लेखनाचं व प्रबोधनाचं कार्य सुरूच ठेवलं. अभंगांसह त्यांनी ‘शंकर दीपिका’, ‘योगाची वाट’, ‘निर्गुणाचं लावण्य’ आणि ‘तेल सिंधू’ या ग्रंथांचं लेखन केल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. त्यांची काव्यप्रतिभा विलक्षणच होती. तेलाच्या व्यवसायातील अनेक रूपकं, उपमा, अलंकार व चित्रण त्यांच्या अभंगांतून झळकतं. त्यांच्या सहजलेखनात किती मोठ्ठं जगण्याचं तत्त्वज्ञान होतं, हे पुढील अभंगांवरून लक्षात येईल-

मजशी ते ब्रह्मज्ञान काही नाही। आपुल्या कृपेने होईल सर्वथाही।। १ ।।
होईल मज आणि माझिया कुळांशी। पांडुरंग मुळाशी सर्व आहे।। २।।
संतु म्हणे ब्रह्म ब्रह्मा सर्व जाणे। आपुले ते मन सुधारले।। ३ ।।

आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा। नंदी जोडियला मन पवनाचा।।१।।
भक्ति हो भावाची लाट टाकियली। शांती शिळा ठेवीली विवेकावरी।।२।।
सुबुद्धीची वढ लावोनी विवेकांस। प्रपंच जोखड खांदी घेतीयले।।३।।
फेरे फिरो दिले जन्मवरी। तेल काढियले चैतन्य ते।।४।।
संतु म्हणे मी हे तेल काढियले। म्हणुनी नांव दिल संतु तेली।।५।।

विवाह

श्री संताजींचा शिक्षण तसे फक्त हिशोब करण्यापुरतेच झाले. आणि ते झाल्यानंतर त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसाय म्हणजे तेल गाळण्यास सुरवात केली. त्याकाळी बालविवाहाची प्रथा होती त्यामुळे श्री संत संताजी महाराजांचा विवाह वयाच्या १२ व्या वर्षीच यमुनाबाईशी विवाह झाला व ते संसाराच्या बेडीत अडकले. आणि आता त्यांचे लक्ष फक्त कुटुंबावरच लागले. त्याच बरोबर त्यांना जसा वेळ मिळेल त्यानुसार भजनाला कीर्तनाला ही जात असत. त्यांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार असल्यामुळे त्यांचे कुटुंबापेक्षा जास्त लक्ष सामाजिक कार्यात होते.

गुरुभेट

त्या काळी श्री संतांचे समाजाला कीर्तनांच्या आणि अभंगांच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. असेच एकदा तुकाराम महाराज श्री संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते. त्यांची कीर्तने ऐकून श्री संताजींवर तुकारामांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला. तेव्हा तुकारामांनी श्री संताजीना समजावून सांगितले, की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. आणि तेव्हापासून श्री संताजी जगनाडे महाराज (संतू तेली ) हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले. संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली.शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वचन संत तुकारामांनी श्री संताजीना दिले होते. परंतु तुकाराम हे श्री संताजी जगनाड्यांच्या अगोदरच वैकुंठाला गेले. असे म्हणतात की, जेव्हा श्री संताजी वारले तेव्हा अंत्य संस्काराच्यावेळी कितीही प्रयत्न केले तरी काही श्री संताजींचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते, त्याचा चेहरा वरच राहत होता. तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले व त्यांनी तीन मुठी माती टाकल्यानंतर श्री संताजींचा पूर्ण देह झाकला गेला.

मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी इ. स. १६८८ साली श्री संताजी महाराजांनी देह ठेवला. जगद्गुरू तुकोबाराय आणि श्री संताजी जगनाडे महाराज हे दोन बिंदू आहेत. या दोन बिंदूंना जोडणारी एक सरळ रेघ आहे. ती रेघ वाकडीतिकडी नाही, अस्पष्ट नाही. ती ठळक आणि स्पष्ट आहे. ही रेघ आहे त्यांच्या प्रेमाची, विश्वासाची, श्रद्धेची आणि आपुलकीची. एका ज्ञानसाधकाच्या, प्रबोधनकाराच्या, तत्त्ववेत्त्याच्या ऐहिक आयुष्याला जरी मर्यादा असली तरी, त्यांच कार्य अमर्याद, असीम, अभंग आणि अखंडच असतं. वारकरीधर्मातील श्री संत जगनाडे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

जीवनात संताजीनी लिखानाचा व्यासंग जोपासला. त्यामुळे त्यांनी अनेक प्रसंगाचे लिखाण केले. त्यामुळेच त्यांना सत्संग प्राप्त झाला. खरे तर जीवनाला आकार देण्याचे सामर्थ्य विचारात आहे व विचारांना आकार देण्याचे सामर्थ्य चिंतनात आहे. म्हणन संताजी नेहमी तुकारामांच्या अभंगाचे चिंतन करत संताजी साहित्य लिखानातून सांगिण बनले होते. आपल्या अंतकरणाचे सामर्थ्य त्यांनी लेखनीत उतरविले होते. संताजी जितके एकपाठी होते तितकेच ते नम्र होते. परमार्थाची साधना केल्याने त्यांना जीवनात लिखानाची तपश्चर्य करावयास मिळाली त्यातूनच ते अद्वितीय विचारांचे साहित्य निर्माण करू शकले. त्यांचे जतन व ते जिवापाड संभाळू शकले. शेवटी साहित्याचे शब्द समाजासाठी व संताचे शब्द परमार्थ व समाजहितासाठी असतात. जीवनास नवी दिशा देण्याचे काम संत साहित्य करीत असते.

तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तेव्हा त्यांच्या अभंगाची गाथा संताजी चाकणला घेऊन आले. अभंगाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्या काळात सामाजिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. सुलतानी संकटाचा त्रास, जाळपोळ, लुटालुट अशा धुमचक्रीत शिवरायांचा पराक्रम भगवा झेंडा किल्ल्यावर फडकाविणे चालूच होते. चाकण येथील संग्राम गडावरील भगवा झेंडा शाहिस्तेखानास व दिलेरखानास दिसला तेव्हा त्याचा चाकणमध्ये धमाकूळ सुरू झाला. आसपासची सर्व गावे ओस पडली. जो तो आपआपला जीव मुठीत घेऊन पळत होता. संताजीची आई सुदुंबऱ्याला आजारी होती.

काय करावे ते संताजींना समजेना. अभंगाच्या वह्या गाठोड्यात बांधल्या. अडोशाला बसले आग बखळीकडे येऊ लागली. मोठ्या मुश्किलीने बाहेर (पडले. काळाकुट्ट अंधार, पावसाची रिपरिप चालू बंद होत होती. त्यातून त्यांनी मार्ग काढला ते एका छप्परवजा घरात घुसले एक म्हातारा मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात लटलट कापत जीव मुठीतघेऊन कोपऱ्यात बसलेला होता. पावलांचा आवाज होताच तो अधिक घाबरला. मी चाकणचा संतू जगनाड़े, सुदुंबऱ्याला चाललो. कसले हे गाठोडे ? तुकोबाचे अभंग, बाबांनी दर्शन घेतले. तेथे थांबणे धोक्याचे होते. संताजींनी रस्ता धरला... सुदुंबऱ्याल ओढा दोन्ही थड्यांनी अथांग पाणी होते. परमेश्वराचे व तुकोबाचे स्मरण करून त्यांनी पाण्यात उडी घेतली. गाथा भिजू न देता ओढा पार केला. आईला भेटले. तुकोबांच्या गाथा पाहून आईचे हृदय प्रेमाने भरून आले. थरथरते हात गाथेवर ठेऊन आईने जगाचा निरोप घेतला. क्रियाकर्म उरकून संताजी चाकणला परतले. गाथा सुरक्षित पाहून लोकांना आनंद झाला. पालखीतून गाथांची मिरवणूक काढण्यात आली.

चाकणवर पुन्हा सुलतानी हल्ला झाला. जाळपोळ लुटालुट व माणसांची कत्तल करणे, उभे पीक कापणे, पेटवून देणे, घरादाराची मोडतोड चालु असताना यमनाबाई व संताजी खेड येथे होते. त्यांनी लगेच चाकणचा रस्ता धरला. कारण घरात तुकोबांचा अमोल ठेवा होता. सर्वांनी त्यांना अडविले, पण अमोल ठेवा वाचविण्यासाठी आपल्या शरीराचे तुकडे झाले तरी चालतील; परंतु अभंगाच्या वह्या जपल्या पाहिजे.

'ग्यानबा तुकाराम' जयघोष केला व चाकणची वाट धरली. भिमा नदीला मिळणारा खेडच्या बाजूने पूर्वेकडे ओढा होता. तुडुंब भरलेला ओढा पात्र मोठे, पाण्याच्या प्रवाहाबरोबर झाडे, अजस्त्र श्वापद जनावरे वाहून जात होती. संताजी ओढ्याजवळ आले. गावाचा जावई आहे काही बरे वाईट झाले तर लोक मोठमोठ्याने ओरडूलागले. असल्या पाण्यात उडी मारू नका. पाणी जोरात आहे. काठी हातात घेऊन ओंडक्याच्या सहाय्याने ओढा पार केला. घरात मागच्या दाराने प्रवेश केला. बाड (अभंग) सुरक्षित पाहून आनंद झाला. वह्या पोत्यात (घोगडीत) घेतल्या. ज्वारीच्या शेतातून संताजी निघाले. मोगल सैन्य पाठलाग करीत होते. बाभळीच्या झाडावर लपून बसले. असंख्य काटे शिरलेेे शरीर रक्तबंबाळ झाले. मध्यरात्री मोगल सैन्य निघून गेले. संताजी तळेगावाहून सुदंबऱ्याला आले. मोगलांचा जोर कमी होताच पुन्हा चाकणला आल. माडलला संसार पुन्हा सुरू केला, संताजींना भागुबाई व बाळोजी ही दोन अपत्ये, बाळोजी मोठा झाल्याने तेलाचा व्यवहार पाहू लागला. संताजी वयोमानानुसार थकले होते. त्यांचे साथीदार त्यांना सोडून स्वर्गात गेले हात वयोमानानुसार आजार आला. त्यातच ते अनंतात विलीन झाले. आयुष्यभर प्राणाची पर्वा ना करता मराठी माणसाची दौलत जतन करण्याचे महान कार्य संतांजींनी केले.

I